पंजाब सरकारने एकाच दिवसात १९ हजार ६४२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये २,१२५ रुपये प्रती क्विंटल किमान समर्थन दराने थेट ५०२.९३ कोटी रुपये जमा केले आहेत. पंजाबचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री लालचंद कटारुचक्क यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांवर कोणतीही कपात लागू केलेली नाही. शुक्रवारपर्यंत सरकारी एजन्सींद्वारे ८ लाख मेट्रिक टन गव्हाचीखरेदी करण्यात आली आहे असेही मंत्र्यांनी सांगितले.
झी बिजनेसने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व केंद्रांवर सुरळीत खरेदी करण्यात यावी, धान्याची योग्य प्रमाणात खरेदी केली जावी याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. अलिकडेच झालेल्या अकवाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने खरेदीच्या नियमात सवलत देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने पंजाब, चंदीगढ, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांसाठी गहू खरेदीच्या दर्जात्मक नियमांमध्ये सवलत दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी कमी होणार आहेत. सरकारने एकसमान दृष्ट्या ६ टक्के तुकडा गव्हाच्या खरेदीऐवजी १८ टक्क्यांपर्यंत प्रमाण वाढवले आहे. या धान्यावर कोणतीही कपात लागू होणार नाही. १० टक्क्यापर्यंत बिगर चमक असलेल्या गव्हाच्या दरावरही कपात नसेल. तर १० ते ८० टक्क्यांपर्यंत गव्हाच्या प्रतवारीवर ५.३१ रुपये प्रती क्विंटलची कपात केली जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले.