पंजाब : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कारखाना प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

जालंधर : मुकेरियातील शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या कार्यालयाला घेराव घालून ऊस तोडणीच्या पावत्यांमध्ये चाललेल्या गोंधळाबाबत प्रशासनाला धारेवर धरुन जोरदार घोषणाबाजी केली. पत्रकारांना याची माहिती देताना शेतकरी गुरनाम सिंह जहानपूर, राजकुमार महिताबपूर, बहादूर सिंह बज्जू आणि इतर शेतकऱ्यांनी प्रशासनावर गैर व्यवस्थापनाचा आरोप केला. कारखाना प्रशासनाच्या चुकीमुळे शेतकरी भरडला जात आहे. ऊस तोडणीच्या पावत्या योग्य पद्धतीने दिल्या जात नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. साखर कारखाने उशीरा सुरू झाल्यामुळे गव्हाची पेरणी सुरू झालेली नाही. ऊस तोडणी पावत्या उशीरा मिळत असल्याने शेतकऱ्यांना नवी पिके घेणे अवघड झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

द ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, कारखाना प्रशासनाकडून कॅलेंडर प्रणालीत पारदर्शकता ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या दबावही त्यांच्यावर वाढला आहे. आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला ऊस विक्री करण्यासाठी लांबवरील साखर कारखान्यांकडे जाण्याची वेळ आली आहे. कॅलेंडर प्रणाली पारदर्शी केली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नावे डिस्प्ले बोर्डवर लावली जावीत. उसाची बिले वेळवर आणि नियमित मिळाली पाहिजे असे शेतकऱ्यांनी सांगितले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करताना महा व्यवस्थापक संजय सिंह यांनी आश्वासन दिले की, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांची पूर्तता केली जाईल. आगामी काही दिवसांत ऊसाच्या तोडणी पावतीचे विवरण पारदर्शक पद्धतीने डिस्प्ले बोर्डवर प्रदर्शित केले जाईल. ते म्हणाले, पुढील काही दिवसात ऊस बिले वेळेवर मिळू लागतील. साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. विभागातील सर्व ऊस योग्य पद्धतीने खरेदी केला जाईल असे संजय सिंह यांनी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here