भटिंडा : शेतातील पालापाचोळा जाळल्यामुळे भटिंडा शहरात शुक्रवारी सकाळी धुराचे लोट पसरले होते. भटिंडातील हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) गेल्या दोन आठवड्यांपासून ‘अत्यंत खराब’ श्रेणीत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) मते 9 नोव्हेंबर रोजी भटिंडाचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) अत्यंत खराब म्हणजे 372 होता. 6 नोव्हेंबर रोजी शहरातील हवेची गुणवत्ता 215 AQI नोंदवली गेली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे AQI चे मोजमाप केले जाते आणि त्यात आठ प्रदूषकांचा विचार केला जातो. शहर धुराने वेढलेले आहे. ज्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
हवेच्या गुणवत्तेबद्दल ‘एएनआय’शी बोलताना रहिवासी शगुन प्रसाद म्हणाले, आजही भटिंडाच्या आकाशात धुराचे लोट दिसत आहे. हवा सतत विषारी बनत असून, लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. धुरामुळे प्रदूषणाची पातळी एवढी वाढली आहे की, परिसरात मॉर्निंग वॉकसाठीही बाहेर पडणे कठीण झाले आहे. आणखी एक रहिवासी संजीव कुमार जैन म्हणाले की, आम्ही पंजाब सरकारला आवाहन करतो की शेतकऱ्यांना पालापाचोळा जाळण्यापासून थांबवावे.
तत्पूर्वी, न्यायमूर्ती एस.के. कौल यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने राज्य सरकारांना वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत एका आठवड्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान सरकारांना निर्देश दिले होते. पंजाब सरकारने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उचललेल्या पावलांची यादी सादर केली आहे.