चंदीगढ़ : राज्य सरकार ऊस दराचा आपल्या हिश्श्याचे प्रती क्विंटल ५० रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट जमा करणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांनी दिली. राज्यातील सर्व साखर कारखाने २० नोव्हेंबरपासून उसाचे गाळप सुरू करतील असे ते म्हणाले.
पंजाब सरकारने ऊस दरवाढीची अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारने उच्च गुणवत्तेच्या उसाला ३८० रुपये प्रती क्विंटल दर दिला आहे. तर मध्यम गुणवत्तेच्या उसाला ३७० रुपये आणि कमी गुणवत्तेच्या उसासाठी ३६५ रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. कृषी मंत्री कुलदिप सिंह धालीवाल यांनी सांगितले की, गळीत हंगाम २०२२-२३ यादरम्यान योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) आणि स्टेट ॲग्रीड प्राइज (एसएपी) यांच्यातील दर फरक पंजाब सरकार आणि खासगी कारखान्यांकडून २:१ या प्रमाणात निश्चित करण्यात आला आहे.