नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या खाद्य मंत्रालयाने २८ जानेवारी २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशातील ५५२ साखर कारखान्यांना १७ लाख टन साखर विक्रीचा कोटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र, गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात कमी साखर विक्रीच्या कोट्यात कपात करण्यात आली आहे.
खाद्य मंत्रालयाने जानेवारी २०२१ या महिन्यात २० लाख टन साखर विक्रीच्या कोट्याला मंजुरी दिली होती. मात्र, आता फेब्रुवारी महिन्यात या तुलनेत ३ लाख टन कमी साखर विक्री केली जाणार आहे. सरकारने गेल्यावर्षी, फेब्रुवारी २०२० या महिन्यातही २० लाख टन साखर कोटा मंजूर केला होता.
बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गेल्यावर्षी आणि या महिन्याच्या तुलनेत साखर कोटा कमी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण राहील. साखरेची किंमत ३० रुपयांवरून ५० रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे, असेही तज्ज्ञांना वाटते.
दरम्यान, केंद्र सरकारने साखरेच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे आणि साखरेच्या दरात स्थिरता आणण्यासाठी साखर विक्रीचा मासिक कोटा पद्धत लागू केली आहे.