सातारा : कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील हंगामात रायगाव शुगर अँड पॉवर या साखर कारखान्याला ऊस गाळपास दिला. कारखान्याने सुरुवातीला शेतकऱ्यांना काटा पेमेंट केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस घातला. परंतु, आठ महीन्यानंतरही कारखान्याने शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी, जाहीर केलेला ऊस दर दिलेला नाही. त्यामुळे रयत क्रांती संघटनेने कारखान्याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेचे सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली शामगाव येथील शेतकऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावर जावून थकीत बिलासंदर्भात जाब विचारला.
रयत क्रांती संघटनेतर्फे कारखाना कर्मचारी राम कदम यांना निवेदन देन्यात आले व दोन दिवसात ऊस बिल शेतकऱ्यांना न मिळाल्यास सर्व शेतकऱ्यांना सोबत घेवून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना सचिन नलवडे यांनी फोन करुन रायगाव कारखान्याने ऊस बिल थकित ठेवून ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याचे सांगितले. साखर आयुक्तांनी माहिती घेवून कारखान्यावर कारवाईसंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांना आदेश देण्याचे आश्वासन दिल्याचे नलवडे यांनी सांगितले.