सातारा : रायगाव शुगर या खासगी साखर कारखान्याचे आठ महिने होऊनही शेतकऱ्यांना जाहीर केलेला ऊस दर दिला नाही. त्यामुळे शामगाव येथील शेतकऱ्यांना सोबत घेवून रयत क्रांतीचे सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार, आज क्रांती संघटनेने आंदोलन सुरू करताच कारखाना प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत सहा सप्टेंबरपर्यंत बिले देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.
शामगाव, चोराडे, कलेढोण, चितळी, राजाचे कुरले व परिसरातील शेतकऱ्यांनी रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली सकाळी कारखाना कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी रयत क्रांती संघटनेचा विजय असो..’, ‘ ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा….’, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कारखाना प्रशासनाने शामगाव येथील शेतकऱ्यांची भेट घेत उद्या त्यांच्या बँक खात्यामध्ये बिले जमा करण्याचे आश्वासन दिले. इतर शेतकऱ्यांची ऊस बिले सहा सप्टेंबरपर्यंत त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे लेखी आश्वासन दिले. संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, तालुका अध्यक्ष विशाल पुस्तके, सुहास पिसाळ, प्रल्हाद पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.