बुरहानपूर (मध्य प्रदेश) : बुरहानपूर रेल्वे स्टेशनवर शुक्रवारी नवा विक्रम झाला. भुसावळचे वरिष्ठ रेल्वे विभाग व्यवस्थापक आर. के. शर्मा यांच्या प्रयत्नांमुळे १५ वर्षानंतर साखरेचा स्टॉक रेल्वे वॅगनमध्ये भरण्यात आला. शर्मा हे रेल्वेचे बिझनेस डेव्हलपमेंट समितीचे अध्यक्षही आहेत.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, शर्मा यांच्यासोबत आमदार सुरेंद्र सिंह ठाकूर, सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा किशोरीदेवी शिवसुमार सिंह यांनी रेल्वेच्या माध्यमात साखर पाठविण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून स्थानिकांचा अधिक फायदा होणार आहे. पंधरा वर्षानंतर शुक्रवारी २१ रेल्वे वॅगन्समध्ये साखर चढविण्यात आली. ती निर्यातीसाठी मुंबईत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे पाठविण्यात आली. यापूर्वी साखर वाहतूक रस्ता मार्गे करण्यात येत होती. मात्र, ती आता रेल्वेतून केली जात आहे.