कोल्हापूर : देशांतर्गत बाजारपेठेत प्रत्येक महिन्याकाठी साखरेची मोठी विक्री होते. कारखाना कार्यस्थळापासून ही साखर देशभर पोहोचविण्यासाठी रेल्वे एक प्रमुख साधन आहे. साखरेच्या या देशांतर्गत वाहतुकीवर असणारा ५ टक्के अधिभार रेल्वेने रद्द केला आहे. याचा फायदा व्यापारी आणि साखर कारखान्यांना होणार आहे. कोल्हापूर रेल्वे गुड्स यार्डचे सीजीएस एल. एन. मेश्राम म्हणाले, गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोल्हापुरातून रेल्वेद्वारे होणारी साखरेची वाहतूक कमी झाली आहे. रेल्वेने दिलेल्या सवलतीचा साखर व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा.
अलीकडच्या काळात साखर वाहतुकीला ट्रक्स आणि इतर साधनेही उपलब्ध झाल्याने रेल्वेद्वारे होणारी वाहतूक आणि त्यातून मिळणारा महसूल कमी होऊ लागला आहे. पावसाळ्यातील जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत मालवाहतूक कमी असते. मालवाहतुकीच्या भाड्याद्वारे महसूल वाढावा, यासाठी रेल्वे दरवर्षी साखरेच्या वाहतुकीवर १५ टक्के सवलत देते. ही सवलत यंदा १ ऑक्टोबरनंतर म्हणजेच साखरेच्या नव्या हंगामातही सुरू राहणार आहे. त्याचबरोबर रेल्वे मिनी रेक आणि टू पॉईंट साखरेच्या वाहतुकीसाठी आकारला जाणारा पाच टक्के अधिभारही रेल्वेने रद्द केला आहे.
एक रेक म्हणजे रेल्वेच्या ४२ वाघिणी किंवा डबे. त्यातून २६ हजार टन साखरेची वाहतूक होते. मिनी रेक म्हणजे रेल्वेच्या २१ वाघिणी, तर टू पॉइंट म्हणजे रेल्वेतून नेली जाणारी साखर २०० किलोमीटरच्या आत दोन ठिकाणी उतरविणे. मिनी रेक आणि टू पॉईंट वनद्वारे साखरेची वाहतूक करताना रेल्वेला कमी भाडे मिळते. त्यामुळे या दोन दोन प्रकारच्या वाहतुकीवर पाच टक्के अधिभार आकारला जात होता.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.