मालवाहतुकीतून रेल्वेने मे 2023 मध्ये मिळवले14642 कोटी रुपयांचे उत्पन्न

भारतीय रेल्वेने मे 2023 मध्ये, 134 मेट्रिक टन मालवाहतूक केली. गेल्यावर्षी याच कालवधीमध्‍ये म्हणजे मे 2022 मध्ये 131.50 मेट्रिक टन मालवाहतूक रेल्वेने केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वेने मालवाहतुकीमध्‍ये अंदाजे 2% ची सुधारणा केली आहे. रेल्वे मालवाहतुकीमधून मे 2022 मध्ये 14083.86 कोटी रूपये महसूल मिळवला होता. तर मे 2023 मध्ये रेल्वे 14641.83 कोटी रूपये महसूल कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या महसुलामध्‍ये सुमारे 4% वाढ झाली आहे.

एप्रिल – मे 2023 मधील एकत्रित आकडेवारी पाहिली तर रेल्वेने 260.28 मेट्रिक टन मालाची वाहतूक केली. गेल्या वर्षी याच काळात रेल्वेने 253.48 मेट्रिक टन माल वाहून नेला आहे. म्हणजेच मालवाहतुकीमध्‍ये अंदाजे 3% ची सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षी रेल्वेने माल वाहतुकीतून 27066.42 कोटी रुपयांची कमाई केली होती. यंदाच्या वर्षी रेल्वेने 28512.46 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई सुमारे 5% नी वाढली आहे.

भारतीय रेल्वेने 65.89 मेट्रिक टन कोळशाची मालवाहतूक केली. त्याखालोखाल लोहखनिजाची 15.23 मेट्रिक टन, सिमेंटची 13.20 मेट्रिक टन वाहतूक केली. तर उर्वरित 10.96 मेट्रिक टन इतर सामुग्रीची वाहतूक केली. कंटेनरच्या माध्‍यमातून 6.79 मेट्रिक टन, तर 4.89 मेट्रिक टन खतांची वाहतूक केली , 4.85 मेट्रिक टन अन्नधान्याची आणि 4.23 टन खनिज तेलांची वाहतूक रेल्वेने मे 2023 मध्ये केली.

‘हंग्री फॉर कार्गो” या मंत्राला अनुसरून, भारतीय रेल्वेने व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी तसेच स्पर्धात्मक किमतीत सेवा वितरण यामध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि लवचिक धोरण तयार करून व्यवसाय विकास कार्य केल्यामुळे रेल्वेला हे यश मिळवणे शक्य झाले आहे.

(Source: PIB)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here