उत्तर प्रदेश ते तामिळनाडूपर्यंत पावसाचा अलर्ट जारी

उत्तर प्रदेश, उत्तराखंडपासून तामिळनाडूपर्यंत देशात अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्याचे दिसून येत आहे. हवामानातील बदलामुळे गेल्या काही दिवसांपासून आर्द्रतेत घट झाली असून तापमान घटले आहे. मात्र, या पावसाने उत्तराखंडमधील काही जिल्ह्यांमध्ये संकट ओढवले आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आला आहे.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हवामान विभागाने सांगितले की, गेल्या २४ तासात उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश केरळ, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, कोंकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड़ा, कर्नाटक किनारपट्टी, तमिळनाडू, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांसह पश्चिम बंगाल, आसाम, जम्मू-कश्मीर, उत्तरी पंजाब, हरियाणात काही ठिकाणी तसेच पूर्व राजस्थान, ओडिशा, उर्वरीत उत्तर पूर्व भारत, रायलसीमा आणि पूर्व गुजरातमध्ये काही ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस नोंदवला गेला आहे.

आयएमडीच्या म्हणण्यानुसार उत्तर भारताच्या विविध भागात १४ सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने उत्तराखंडमधील हवामानासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीत आज म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी किमान तापमान २४ अंश आणि कमाल तापमान ३२ अंशांवर नोंदवले जाऊ शकते. आज नवी दिल्लीत ढगाळ वातावरण असेल. या काळात राजधानीतही पाऊस पडू शकतो.

हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटच्या मते, पुढील २४ तासांत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि केरळमधील काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, उत्तर पंजाब, हरियाणाचा काही भाग, दिल्ली, पूर्व राजस्थान, ओडिशा, रायलसीमा आणि पूर्व गुजरातमध्ये हलका पाऊस पडू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here