नवी दिल्ली : मान्सून देशभरात अद्याप सक्रिय आहे. देशाच्या अनेक भागात सातत्याने पाऊस सुरू आहे. आजही देशाच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, जुलै महिन्यात देशात चांगला पाऊस कोसळला. मात्र, नव्या महिन्यात, ऑगस्टमध्ये त्याची तिव्रता हळूहळू कमी होऊ शकते, असे अनुमान आहे.
न्यूज २४ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन दिवस पूर्व आणि मध्य पूर्व भारतात हलका ते जोरदार पावसाचे पुर्वानुमान वर्तवले आहे. शिवाय, आयएमडीने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहारसह देशाच्या अनेक भागात आज मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आज मध्य प्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगढ, आसम, मेघालय, कोंकण आणि गोव्याशिवाय मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस कोसळू शकतो असे सांगण्यात आले आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, २ ते ४ ऑगस्ट यादरम्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, हरियाणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पूर्व राजस्थानच्या अनेक भागात ३ आणि ४ ऑगस्ट रोजी चांगल्या पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणात ३ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस कोसळेल. याशिवाय, महाराष्ट्र, कर्नाटकची किनारपट्टी, गोवा राज्यासह अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर स्कायमेट या खासगी हवामान एजन्सीने आज जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहारसह छत्तीसगढ आणि पूर्व मध्य प्रदेशात काही ठिकाणी हलका ते मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.