गांधीनगर : मध्य आणि दक्षिण गुजरातमध्ये पुरामुळे ५०,००० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अनुमान राज्य सरकारने व्यक्त केले आहे. मध्य गुजरातमध्ये बागायती पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे, तर दक्षिण गुजरातमध्ये तेलबिया, तृणधान्ये आणि कडधान्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. राज्यात ऊस पिकाचेही मोठे नुकसान या पुरामुळे झाले आहे.
सद्यस्थितीत ऊस शेतीचे किती नुकसान झाले आहे, याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही. प्रसार माध्यमातील रिपोर्टनुसार, राज्याच्या कृषी विभागाकडील नोंदीनुसार मध्य आणि दक्षिण गुजरातमध्ये १,२२,००० हेक्टरवर कापूस, २९,६०० हेक्टरवर सोयाबीन आणि ७७,७०० हेक्टरवर भात शेती केली जाते. शेतांमध्ये जर आणखी काही काळ पाणी राहिले तर या पिकांचे खूप नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. छोटा उदयपूर जिल्ह्यात ११ जुलैपर्यंत ८१,१०० हेक्टर क्षेत्रात पिकाची लागवड करण्यात आली होती. यामध्ये २६,६०० हेक्टर बागायतीचाही समावेश आहे. प्राथमिक अंदाजानुसार, पावसामुळे २०,००० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. नर्मदा जिल्ह्यात ६८,७६४ हेक्टर जमिनीवर शेती करण्यात आली आहे. यामध्ये ९,६१० हेक्टरमध्ये बागायती आहे. यातील किमान १० टक्के क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे.