मुंबई : महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा आणि १८१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ७,९६३ लोकांना वाचविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पालघर, पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी आहे. शनिवारी या भागाला काहीसा दिलासा मिळू शकतो. यादरम्यान, महाराष्ट्रातील कोकण भागात एक आठवडा पावसाचा मारा झेलल्यानंतर शनिवारी याची तिव्रता कमी होईल अशी शक्यता आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) व्यक्त केलेल्या पुर्वानुमानानुसार, शुक्रवारी पालघर, रायगड आणि पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर विविध ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईत शहर आणि उपनगरात पावसाची शक्यता आहे. ताशी ४५-५५ किमी प्रती तास ते ६५ किमी प्रती तास वेगाने वारे वाहतील. जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. पालघर, पुणे, सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळी संपलेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये २९० मिमी, लोणावळा येथे २३० मिमी, पालघर जिल्ह्यातील तलासरीमध्ये २७० मिमी पाऊस कोसळला आहे. रायगड, माथेरान, वाडा जवाहर येथेही जोरदार पावसाची नोंद झाली.