इस्लामपूर: राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कारंदवाडी युनिट नं.३ चे ७/१२ चे उतारे, व मालमत्तेवरील नोंदी वाळवा उप विभागाचे प्रांताधिकाऱ्यांनी आज (मंगळवार) पूर्ववत बदलून दिल्या आहेत. अखेर न्यायालयीन लढाईमध्ये सत्याचा विजय झाला आहे. यामुळे आमचे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार,वाहतूक कंत्राटदार,व हितचिंतकांच्यामध्ये आनंद,व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांनी दिली.
श्री.पाटील अधिक माहिती देताना म्हणाले,विष्णू तुकाराम पाटील (रा.कर्नाळ) व इतर दोन साथीदारांनी सर्वोदय सहकारी साखर कारखाना,व राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना या दोन साखर कारखान्या च्यामधील करारासंदर्भात तत्कालीन राज्याचे सहकारमंत्री यांच्याकडे निवेदन दाखल केले होते. या निवेदना संदर्भांत त्यांनी तीन बैठका घेतल्या होत्या. हा संदर्भ घेवून सहकार, पणन,व वस्त्रोद्योग विभागाचे उप सचिवांनी दि.२५ जानेवारी २०१९ रोजी पारित केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र्र जमीन महसूल अधिनियम तरतुदीचे पालन न करता राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखानाच्या कारंदवाडी युनिट नं.३ च्या नावावरील ७/१२ उतारे,व मालमत्तेवरील नोंदी रद्द करून सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या नावावरती करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने मा.उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मा.उच्च न्यायालय,मुंबई यांच्याकडे दि.५ फेब्रुवारी २०१९ रोजी सदर आदेशास स्थगिती दिली होती.
श्री.पाटील पुढे म्हणाले,त्यानंतर राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने वाळवा उपविभागाचे प्रांताधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. परंतू सर्वोदय सहकारी साखर कारखान्याच्या विनंती वरून सदर अपील सांगली जिल्ह्याचे उप जिल्हाधिकारी (महसूल) यांच्या कडे वर्ग करण्यात आले होते. उप जिल्हाधिकारी (महसूल) यांनी दि.२४ जानेवारी २०२० रोजी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने केलेले अपील मान्य करून सर्वोदय सहकारी साखर साखर कारखान्याच्या नावावर केलेले ७/१२ उतारे,व मालमत्तेवरील नोंदी पूर्ववत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कारंदवाडी युनिट नं.३ च्या नावावरती करण्याचे आदेश पारित होते. या आदेशानुसार वाळवा उपविभागाचे प्रांताधिकारी यांनी आज पूर्ववत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कारंदवाडी युनिट नं.३ च्या नावावरती ७/१२ उतारे,व मालमत्तेच्या नोंदी केल्या आहेत. यामुळे राजारामबापू समूहामध्ये आनंद,व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील,संचालक श्रेणीक कबाडे,विराज शिंदे,माणिक शेळके, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर प्रामुख्याने उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.