कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आगामी ११ महिन्यांत कारखाना सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणार आहे अशी घोषणा कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी केली. कारखान्याच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक होते. दरम्यान, सभेत सर्व विषय मंजूर करण्यात आले. तर विरोधकांनी सभास्थळी येऊ न देता, आमच्या प्रश्नांची उत्तरे न देता सभा गुंडाळल्याचा आरोप करत समांतर सभा घेतली. केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपयांवरून वरून ३८०० रुपये प्रति क्विटल करावा अशी मागणी केली. तर कार्यकारी संचालकांवर हल्ला करणाऱ्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
चेअरमन अमल महाडिक म्हणाले की, केंद्राने साखर पॅकिंगसाठी २० टक्के ज्यूट पोत्यांची सक्ती रद्द करावी. ऊस तोडणी यंत्रासाठीचे अनुदान ३० टक्के वरून ५० टक्के करावे. उसाचा समावेश पीक विमा योजनेत करावा. साखर माल तरण व मध्यम मुदत कर्जाचे व्याजदर ७ ते ८ टक्क्यांपर्यंत कमी करावेत. इथेनॉल प्रकल्पासाठी सरकारने दीर्घ मुदतीने बिनव्याजी कर्ज द्यावे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत वाढवावे. याचबरोबर राज्य सरकारने वीज खरेदी दर किमान ६ रुपये प्रतियुनिट करावा. गोपीनाथ मुंडे महामंडळाकरिता प्रतिवर्षी प्रतिटन दहा रुपये निधी घेण्याचा निर्णय रद्द करावा. कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. व्हा. चेअरमन गोविंद चौगले, संचालक सर्जेराव पाटील-बोने, दिलीप पाटील, दिलीप उलपे, तानाजी पाटील, माजी नगरसेवक सत्यजित कदम आदींसह संचालक, सभासद उपस्थित होते. माजी चेअरमन शिवाजी पाटील यांनी आभार मानले. समांतर सभेच्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी झाली.
राजाराम कारखान्याच्या कर्जाचा बोजा ४७० कोटींवर जाईल : विरोधकांचा समांतर सभेत आरोप
राजाराम सहकारी साखर कारखान्याची एकूण कर्जे व देणे ३१५ कोटी रुपये आहेत. शिल्लक साखर व स्टोअरमालची किंमत १४४.७२ कोटी रुपये आहे. कारखाना सध्या १७०.३० कोटी रुपयांच्या शॉर्ट मार्जिनमध्ये आहे. आता सहवीजनिर्मिती प्रकल्पासाठी जिल्हा बँकांकडून १२४ कोटी रुपये कर्ज घेणार आहे. एनसीडीसीकडून १७६ कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. त्यामुळे एकूण कर्ज व देणी ४७० कोटींवर जातील. याचा बोजा सर्वसामान्य शेतकऱ्यांवर पडणार आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांनी खुलासा केला नाही, अशी टीका विरोधी सभासदांनी केली. वार्षिक सभेमध्ये विरोधकांना बोलू दिले जात नाही. सभेत पुढे येऊ दिले जात नाही. स्पीकरसह तेथे जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने विरोधकांनी कारखाना प्रवेशद्वारावर समांतर सभा घेत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला.
समांतर सभेत रघुनाथ चव्हाण (कांडगाव), दिलीप पाटील (टोप), विद्यानंद जामदार, मोहन सालपे, बाबासाहेब देशमुख (शिरोली), श्रीहरी पाटील, प्रशांत पाटील यांची भाषणे झाली. कारखान्याची सद्यस्थिती व सभासदांच्या हक्काच्या मागण्यांबाबत सत्ताधारी काही बोलतील का? असा प्रश्न उपस्थित करणारी पत्रके सभा मार्गावर राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीने सभासदांना वाटली. सहवीज प्रकल्पाचे भूमिपूजन सर्वसामान्य सभासदांना अंधारात ठेवून गुपचूप का उरकले ? जुन्या तोडणी वाहतूक अॅडव्हान्स वसुलीचे काय? या प्रश्नांची उत्तरे सत्ताधाऱ्यांनी सभेत दिली नाहीत, असा आरोप करण्यात आला. श्रीराम संस्थेचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील, शशिकांत खवरे, तानाजी चव्हाण, अनंत पाटील, मिलिंद पाटील, दत्तात्रय उलपे आदींसह सभासद उपस्थित होते.