कोल्हापूर : कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे यंदा पाच लाख टन गाळपाचे व १२.२५ टक्के साखर उताऱ्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सक्षम ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा उभी केली आहे, असे प्रतिपादन चेअरमन अमल महाडिक यांनी केले. कारखान्याचा चालू गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन कारखान्याचे संचालक सर्जेराव पाटील व त्यांच्या पत्नी सुधा यांच्या हस्ते झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून महाडिक बोलत होते.
चेअरमन अमल महाडिक म्हणाले की, कारखान्यातील तांत्रिक बदलामुळे हंगामात अपेक्षित रिझल्ट मिळतील. आगामी काळात कारखान्यात १८.५ मे. वॅट क्षमतेच्या सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणीसह प्रतिदिन ५००० मे. टन गाळप क्षमतेचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमात कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी स्वागत केले. व्हा. चेअरमन नारायण चव्हाण यांनी आभार मानले. कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक तसेच सर्व पदाधिकारी, मान्यवर, शेतकरी, सभासद उपस्थित होते.