सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने सहवीज प्रकल्प व विस्तार वाढीसाठी घेतलेली प्रतिटन रुपये १४७ ची ठेव दोन टप्प्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना परत केली आहे. या ठेवींवरील तसेच रुपांतरीत ठेवींवरील व्याजाची रक्कम ३ कोटी ४४ लाख दि. ११ रोजी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली.
प्रतीक पाटील म्हणाले, आपण माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २०१४ साली सहवीज व विस्तार वाढीचा महत्वकांक्षी प्रकल्प यशस्वी पूर्ण केला. या प्रकल्पासाठी प्रतिटन रुपये १४७ ची ठेव ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांकडून घेतली होती. ही एकूण रक्कम रुपये २४ कोटी १५ लाख इतकी होती. यातील प्रतिटन रुपये ७५ प्रमाणे १२ कोटी ३५ लाख दि.१ नोव्हेंबर २०२३ रोजी तर उर्वरित प्रतिटन रुपये ७२ प्रमाणे ११ कोटी ८० लाख दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना परत केले आहेत. यावरील व्याज २ कोटी ८९ लाख ५६ हजार, तसेच रुपांतरीत ठेव रक्कम रुपये ४ कोटी ८० लाखावरील व्याज ५४ लाख १ हजार असे एकूण ३ कोटी ४४ लाख दि.११ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.
दि. १ ऑगस्ट २०२४ पासून सभासद साखर प्रतिमहिना ७ किलोवरून प्रतिमहिना ९ किलो केली आहे. तसेच दिवाळीला ९ किलो साखर देत आहोत. दि. १ ऑक्टोबर २०२४ पासून दिवाळी साखर वाटप सुरू केली आहे. कारखान्याच्या चारही युनिटमध्ये ऑफ सिझनची कामे गतीने सुरू आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस आपल्या कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, माल खरेदी समितीचे अध्यक्ष देवराज पाटील, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, सचिव डी. एम. पाटील, मुख्य लेखापाल संतोष खटावकर, जयकर फसाले आदी उपस्थित होते.