सांगली : राजारामबापू साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव- सुरूल, कारंदवाडी युनिटकडे २०२२-२३ मध्ये आलेल्या उसास प्रतिटन १०६ रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता देणार असल्याची माहिती राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली. दुसऱ्या हप्त्याची एकूण १८ कोटी २२ लाख रुपये रक्कम ७ ऑगस्ट २०२३ रोजी उस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल, असेही त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले कि, कारखान्याने २०२२-२३ गाळप हंगामात तिन्ही युनिटमध्ये एकूण १७ लाख १९ हजार २३३ टन उसाचे गाळप केलेले आहे. कारखान्याने यापूर्वी प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ५१६ कोटी ७७ लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केले आहेत. आता १०६ रुपये देत असल्याने शेतकऱ्यांना एकूण ३,१०६ रुपये मिळणार आहेत. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील, प्रदीपकुमार पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, संतोष खटावकर उपस्थित होते.