सांगली : राजारामबापू कारखान्याने गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांना शुद्ध व पायाभूत बियाण्यांचा पुरवठा करून उसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी ऊस रोपवाटिका उपक्रम सुरू केला आहे. त्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, संचालक अतुल पाटील यांनी सांगितले. कारखान्याच्या कारंदवाडी (ता. वाळवा) व तिप्पेहळ्ळी (जत) युनिटच्या रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कारंदवाडी युनिटमध्ये संचालक प्रदीपकुमार पाटील यांच्या हस्ते, तर तिप्पेहळ्ळी-जत युनिटमध्ये संचालक अतुल पाटील यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले. यावेळी प्रदीपकुमार पाटील यांनी सांगितले की, आम्ही माजी मंत्री आ. जयंत पाटील, अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोनद्वारे औषध फवारणी, मल्टिस्पेक्ट्रम ड्रोन कॅमेरा, ठिबक सिंचन आदी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहोत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. संचालक देवराज पाटील, विठ्ठल पाटील, कार्तिक पाटील, बबनराव थोटे, प्रताप पाटील, मेघा पाटील, डॉ. योजना शिंदे-पाटील, शैलेश पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, कामगार नेते शंकरराव भोसले प्रामुख्याने उपस्थित होते.