राजस्थानमधील बारां येथे गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे कापणी केलेल्या सोयाबीन, उडीद, भात या पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सलग तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे क्लेम पेडिंग ठेवले आहेत. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी कापलेले सोयाबीन आग लावून पेटवून दिले आहे. व्यापाऱ्यांकडून घेतलेले पैसे, बँकांकडील कर्जामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिशय दयनीय स्थिती झाली आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांना सरकार आणि विमा कंपन्यांकडून मदतीची अपेक्षा आहे. लसूण उत्पादक शेतकरीही चिंतेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दरवाढीच्या प्रतीक्षेत त्यांनी लसूणचा साठा केला आहे. मात्र, दर न मिळाल्याने ते आता नदीमध्ये लसूण फेकून देत आहेत. गोगचा येथील शेतकरी राम किशन नागर यांनी सांगितले की, त्यांनी महागडे बियाणे घेऊन दहा गुंठ्यात सोयाबीन लागवड केली. त्यासाठी औषधे, किटकनाशकांचा खर्चही केला. मात्र, पावसाने या साऱ्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अशीच बिकट अवस्था झाली आहे.