पुणे : ‘डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया’ तर्फे ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’च्या अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख राजेंद्र चांदगुडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. साखर उद्योगासाठी उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते पुणे येथे ‘डेक्कन शुगर’ च्या ६८ व्या वार्षिक सभेत हा पुरस्कार देण्यात आला.
चांदगुडे हे गेली २८ वर्षे अभियंता, संशोधक, लेखक आणि जगभरातील संस्थांचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ते साखर कारखान्यांची कार्यक्षमता, साखर उतारा सुधारणेसाठी मार्गदर्शन करतात. त्यांनी तीसहून अधिक शोधनिबंध पुस्तके लिहिली आहेत.
पुरस्कार वितरणावेळी ‘डेक्कन’चे अध्यक्ष एस. बी. भड, उपाध्यक्ष एस. एस. शिरगावकर, एम. के. पटेल, एस. डी. बोखारे, गौरी पवार, व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू पाटील, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदी उपस्थित होते.