राजगड साखर कारखान्याची थकीत देणी आठवडाभरात देणार : अध्यक्ष आमदार थोपटे

पुणे : राजगड साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांचे एफआरपी देणी, कामगारांचे थकीत पगार, वाहतूक ऊस तोडणी कामगारांची देणी आठवडाभरात देणार आहोत. बँकेला लवकरच कर्ज मिळणार असून, त्यातून
प्राधान्याने सर्वांची देणी देणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष, आमदार संग्राम थोपटे यांनी केले.

राजगड सहकारी कारखान्याची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. त्यावेळी अध्यक्ष थोपटे म्हणाले की, कारखान्याची आर्थिक कोंडी झाली आहे. यंत्रणा चालवताना ओढाताण होत आहे. मात्र, आम्ही कोणाचाही एकही रुपया बुडवलेला नाही. उशीर होत असल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, या वर्षी कारखान्याचा हंगाम १०० टक्के चालू करणार असल्याचा दावा त्यांनी केला.

अध्यक्ष थोपटे म्हणाले की, मागील हंगामात अचानक राजगड कारखाना बंद ठेवल्यामुळे यंदाचा हंगाम सुरू होणार की नाही, याबाबत अनेकांना शंका होती. मात्र, मी मैदान सोडून जाणारा नाही. ‘राजगड’च्या घडामोडीला मी जबाबदार आहे. अध्यक्ष म्हणून कारखान्याशी सर्वच संबंधित घटकांना समाधानी ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. काळ कठीण आहे. मात्र, हंगामासाठी कामगार, शेतकरी आदी घटकांनी सहकार्य करावे.

कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी अहवाल वाचन केले. सभासदांच्या संमतीने कार्यक्रम पत्रिकेतील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. यावेळी भोर तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे, के. डी. सोनवणे, शिवाजीराव कोंडे, अशोक शेलार, अरविंद सोंडकर, नाना राऊत, प्रताप शिळीमकर, दिनकर धरपाळे, शोभा जाधव, सुरेखा निगडे, बाजार समिती अध्यक्ष आनंदा आंबवले, अतुल किंद्रे, आबासाहेब यादव, अमोल नलावडे, सोमनाथ सोमाणी, बबन इंगुळकर, शंकर मालुसरे, राज तनपुरे, दत्ता बाठे उपस्थित होते. उपाध्यक्ष पोपटराव सुके यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here