हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनीमंडी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेतली. साखर आयुक्तालयाकडून थकीत एफआरपीप्रकरणी साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई सुरू आहे. पण, शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये त्याचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत. त्यामुळे आता थकीत एफआरपीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा खासदार शेट्टी यांनी दिला. तसेच कारखान्यांवर जप्तीची कारवाई करूनही शेतकऱ्यांना पैसे न दिल्याबद्दल संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थकीत एफआरपीच्या विषयात लक्ष घालता न आल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. साखर आयुक्तांकडून थकीत एफआरपीची माहिती घेतल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, चालू हंगामात राज्यात एफआरपीचे ३ हजार ५९५ कोटी रुपये थकीत आहेत. राज्यातील १९५ पैकी केवळ ४३ कारखान्यांनीच एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केली आहे. काही कारखाने मंत्र्यांच्या मालकीचे असल्याने त्यांच्यावर कारवाई करताना टाळाटाळ झाल्याचे दिसत आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी साखर आयुक्तालयाच्या आदेशाप्रमाणे काम न केल्यामुळे त्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. त्यानंतरही कारवाई झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा खासदार शेट्टी यांनी यावेळी दिला. प्रत्यक्षात दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यावर फुंकर घालण्यात सरकारला अपयश आल्याची टीका खासदार शेट्टी यांनी केली.