कोल्हापूर:माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसमोर आव्हान उभारण्याचा प्रयत्न करत भाजपने आपल्या कोट्यातून विधान परिषदेसाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे.ऊसपट्ट्यातील मते ‘कॅश’ करण्यासाठी भाजपने ही चाल खेळल्याचे बोलले जात आहे.सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मते टिकवणे हे राजू शेट्टी यांच्यासमोर प्रमुख आव्हान आहे.
शेट्टी यांनी २०१९ ची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून लढविली. त्यावेळी भाजपच्या प्रचारासाठी खोत यांनी शेट्टी यांच्याविरोधात रात्रीचा दिवस केला.शेट्टी यांच्यावर आरोपांची राळ उडविली.शेट्टी पराभूत झाले.पुढे राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाले.खोत यांचे राज्यमंत्रिपद गेले, पुढे आमदारकीही गेली.सत्ता जाताच सगळे गेले, येणारे फोन बंद झाले आणि मी एकटाच पडलो, अशी खंत खोत यांनी व्यक्त केली होती.मात्र, भाजपने आता अचूक वेळ हेरून खोत यांना आमदारकीची संधी दिली आहे.त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत ‘स्वाभिमानी’ विरुद्ध आघाडी उघडावी लागेल. ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून खोत पुढे आले, त्या संघटनेचे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी त्यांना ताकदीने राजकीय आखाड्यात उतरावे लागणार आहे.दोन शेतकरी नेत्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.