कोल्हापूर : मागील हंगामातील उसाला जादा 400 रूपये देण्यास साखर कारखानदारांनी असमर्थता दर्शविल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखालील साखर कारखानदार व संघटना प्रतिनिधींची बैठक तिसऱ्यांदा फिस्कटली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटना मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाचा दरफरक मिळाला पाहिजे, यावर ठाम राहिल्या. दरम्यान, मागील हंगामातील उसाच्या दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय पालकमंत्री मुश्रीफ यांनी घेतला. मात्र, राजू शेट्टी यांनी हा तोडगा अमान्य करत रविवारी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील हंगामातील चारशे रुपये व चालू हंगामात प्रतिटन ३५०० रुपये द्यावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. गेली महिनाभर सुरू असलेल्या आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा बैठक घेतली. पण ती अयशस्वी झाली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी बैठक बोलावून ठेवलेला प्रस्ताव संघटनेने अमान्य केला. या बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला होता.
बैठकीला खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, राजेंद्र पाटील- यड्रावकर, चंद्रदीप नरके, प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, धनाजी चुडमुंगे विजय औताडे, पी. जी. मेढे आदी उपस्थित होते. दरम्यान, चालू हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन किमान ३१०० रुपये पहिली उचल दिली जाईल, असे कारखानदारांनी मान्य केले. पण, मागील हंगामाचे बोला, मग चालूवर चर्चा करू, या भूमिकेवर शेट्टी ठाम राहिले. यावेळी रामभाऊ डांगे, दिलीप माणगावे, भोला कागले यांच्या कृती समितीने ३००० रुपये एफआरपी मान्य असल्याचे सांगत कारखाने सुरू करण्याची मागणी बैठकीत केल्याने ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यामुळे बैठकीत गोंधळ उडाला.