जय श्री राम : अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. भव्य मंदिराच्या गर्भगृहात झालेल्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विधी केल्या.भावपूर्ण भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडला. भारतीय हवाई दलाच्या (IAF) हेलिकॉप्टरने अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर परिसरावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. सोहळा पार पडताच हजारो भाविकांनी ‘जय श्री राम’चा जयघोष केला. आरएसएस प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या समारंभाला प्रमुख उपस्थित होते.

या सोहळ्यासाठी जगभरातील 8,000 हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक पंथांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. विविध आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींसह समाजाच्या सर्व स्तरातील लोकही या सोहळ्याला उपस्थित आहेत.

भव्य श्री रामजन्मभूमी मंदिर पारंपारिक नगारा शैलीत बांधले गेले आहे. त्याची लांबी (पूर्व-पश्चिम) 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे. मंदिराला एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे आहेत. मंदिराचे खांब आणि भिंतीवर हिंदू देव-देवता यांचे शिल्प चित्रण आहे. तळमजल्यावर मुख्य गर्भगृहात भगवान श्री राम यांची मूर्ती ठेवण्यात आली आहे.

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला आहे. मंदिरात एकूण पाच मंडप (हॉल) आहेत. त्यात नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप यांचा समावेश आहे. मंदिराजवळ एक ऐतिहासिक विहीर (सीताकूप) आहे, जी प्राचीन काळातील आहे. मंदिर परिसराच्या नैऋत्य भागात, कुबेर टिळा येथे, भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार, जटायूच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

मंदिराचा पाया 14 मीटर-जाड रोलर-कॉम्पॅक्टेड काँक्रीट (RCC) च्या थराने बांधण्यात आला आहे, ज्यामुळे त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिरात कुठेही लोखंडाचा वापर केलेला नाही. जमिनीतील ओलाव्यापासून संरक्षणासाठी ग्रॅनाइटचा वापर करून २१ फूट उंचीचा प्लिंथ बांधण्यात आला आहे. मंदिर संकुलात सांडपाणी प्रक्रिया केंद्र, जलशुद्धीकरण केंद्र, अग्नी सुरक्षेसाठी पाणीपुरवठा आणि स्वतंत्र वीज केंद्र आहे. देशातील पारंपारिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here