पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज, त्यांचा मुलगा हमजा यांना साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी दिलासा

लाहौर : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना २०१९ मधील भ्रष्टाचार प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. एका अकाउंटॅब्लिटी न्यायालयाने पुढील कार्यवाहीवर निर्बंध लागू केले आहेत. आणि देशाच्या उत्तरदायित्व कायद्यातील बदलांनंतर हे प्रकरण भ्रष्टाचार विरोधी संस्थेकडे परत पाठवले. नॅशनल अकाऊंटॅब्लिटी ब्युरोने (एनएबी) फेब्रुवारी २०१९ मध्ये शहबाज आणि त्यांचा मुलगा हमजा यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवला होता. पंजाबचे मुख्यमंत्री असल्याच्या कार्यकाळात शहबाज यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला असून आपल्या मुलाच्या मालकीच्या रमजान साखर कारखान्याला लाभ पोहोचविण्याबाबत आदेश दिले आहेत, असा आरोप एनएबीने केले होते.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एनएबीने सांगितले की, यामुळे देशाच्या राष्ट्रीय खजान्याचे २१.३ कोटी पाकिस्तानी रुपयांचे (जवळपास ९,४८,५६५ डॉलर) नुकसान झाले आहे. तर पंतप्रधानांचे वकील अमजद परवेज यांनी पीटीआयला सांगितले की, रमजान साखर कारखान्याचे पंतप्रधान शहबाज आणि त्यांचा मुलगा हमजा यांच्याविरोधातील हे प्रकरण एकप्रकारे बंद करण्यात आले आहे. कारण संसदेने मंजूर केलेल्या कायद्यानुसार हे प्रकरण आता अकाऊंटॅब्लिटी कोर्टाच्या कार्यकक्षेत येत नाही. लाहोर कोर्टाने शहबाज आणि हमजा यांच्याविरोधातील रमजान साखर कारखान्याच्या प्रकरणाची कार्यवाही थांबवली असून ती एनएबीकडे परत पाठवली आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here