नवी दिल्ली : देशात गेल्या एक महिन्यानंतर १७ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्यानंतर एकूण संक्रमितांची संख्या १,११,५६,९२३ झाली आहे.
केंद्र सरकारकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २९ जानेवारी रोजी देशभरात एका दिवसात १८ हजार ८५५ रुग्ण आढळले होते. देशात सक्रीय रुग्णांची संख्या १,७३,४१३ आहे. तर डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या १,०८,२६,०७५ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात गेल्या चोवीस तासात १७४०७ रुग्ण आढळले तर ८९ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या १,५७,४३५ झाली आहे. सध्या देशात १,७३,४१३ जणांवर उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी १.५५ टक्के आहे. देशात १०८२६०७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.०३वर पोहोचली आहे. तर मृत्यूदर १.४१ टक्के आहे. गेल्यावर्षी ७ ऑगस्ट रोजी संक्रमितांची संख्या २० लाख, २३ ऑगस्ट रोजी ३० लाख तर पाच सप्टेंबर रोजी ४० लाखांवर पोहोचली होती.
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार, देशात तीन मार्चपर्यंत २१९१७८९०८ नमुने तपासण्यात आले असून यापैकी ७७५६३१ जणांची तपासणी बुधवारी करण्यात आली.