पुणे : उशिरा तोडल्या जाणाऱ्या उसाला पुढील महिन्यापासून ७५ ते १५० रुपये याप्रमाणे वाढीव दर दिला जाणार आहे. भविष्यातील ऊसतोड मजुरांच्या कमतरतेमुळे हार्वेस्टरचा वापर वाढणार असून त्यासाठी शेतकऱ्यांनी उसाची लागवड कमीत कमी चार ते पाच फुटी सरी काढून करावी. यामुळे हार्वेस्टरने ऊसतोडणी करता येईल, असे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
वाल्हे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्यासह सोमेश्वर कारखाना कार्यस्थळावर जाऊन कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांची भेट घेतली. त्यावेळी जगताप बोलत होते. पुरंदर तालुक्यात पाऊस झाला नसल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, शेतातील उभा ऊस पाण्यावाचून करपून जाऊ लागला आहे. पुरंदर तालुक्यातील ऊस श्री सोमेश्वर साखर कारखान्याला जातो. मात्र, अद्यापही जून महिन्यातील ऊस लागवडीची नोंद असलेला ऊसतोडणी सुरू आहे.
मात्र, जवळपास सतरा महिने पार केलेल्या व पाणीटंचाई असलेल्या उसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावेळी वाल्हे गावचे माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, पिसुर्तीचे माजी सरपंच अशोक बरकडे, पोपट बरकडे, सागर भुजबळ, जयवंत भुजबळ, सुहास खवले, तुषार भुजबळ, राजेंद्र दुर्गाडे, बाळासाहेब चोरमले, दादासाहेब मदने, जगन्नाथ बरकडे, दादा बरकडे आदी उपस्थित होते.