नवी दिल्ली : तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून या महिन्यात व्याज दरात ५० अंकांच्या आधारावर वाढ केली जावू शकते. ऑगस्ट महिन्यात पुन्हा महागाईच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जर आरबीआयने यावेळी दरवाढ केली, तर सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ पाहायला मिळेल. यावर्षी आरबीआयने रेपो रेटमध्ये १.४० टक्क्यांची वाढ केली आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भारताचा किरकोळ महागाईचा दर ऑगस्ट महिन्यात वाढून ७ टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलै महिन्यात हा दर ६.७१ टक्के होता.
डीएनए इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यात महागाईचा दर ६.९ टक्क्यांपेक्षा अधिक राहील, अशी शक्यता होती. ही सलग आठवी वेळ आहे, जेव्हा देशातील महागाई मर्यादेपेक्षा अधिक वाढली आहे. अन्नधान्य महागाई ऑगस्ट २०२२ मध्ये ७.६२ टक्क्यांच्या दरापेक्षा वाढला आहे. जुलै महिन्यात हा दर ६.७५ टक्के होता. बार्कलेज बँकेचे मुख्य भारतीय अर्थतज्ज्ञ राहुल बाजोरीया यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने महागाईचे आकडे पाहायला मिळत आहेत, त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी आरबीआय एमपीसी रेपो रेटमध्ये वाढ करू शकते. तर सप्टेंबर महिन्यातील बैठकीनंतर आरबीआय २५ अंकांच्या आधारावर दरवाढ करू शकेल अशी शक्यता कॅपिटल इकॉनॉमिक्सचे सीनिअर इंडियन इकॉनॉमिस्ट शिलन शहा यांनी व्यक्त केली.