नवी दिल्ली : पुढील आर्थिक वर्षात आरबीआयकडून जारी करण्यात येणाऱ्या प्रस्तावीत डिजिटल रुपयामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. याशिवाय काळा पैसा रोखण्यासाठी याची खूप मदत होईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
एएनआयशी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरबीआयकडे डिजिटल रुपयाचे प्रत्येक चिन्ह असेल. जर तुम्ही एखाद्या दुकानदारांकडून काही वस्तू खरेदी केली आणि डिजिटल देवाणघेवाण केली, तसेच त्या दुकानदाराने आपल्या आपल्या विक्रेत्याला जर त्या डिजिटल पैशाचा वापर करून देणी भागवली असतील तर त्या व्यवहाराचे सर्व तपशील आरबीआयकडे असतील.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जमिनीशी संबंधित व्यवहारातून अनेकदा काळ्या पैशाची रोखीत निर्मिती होते. त्यावर कोणताही कर लावणे शक्य नसते. मात्र जर आरबीआयकडे प्रत्येक डिजिटल व्यवहाराच्या खुणा असतील तर कोणत्याही व्यक्तीला करांपासून वाचणे अशक्य होणार आहे. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात डिजिटल रुपयाची घोषणा करताना म्हटले होते की, केंद्रीय बॅंक डिजिटल करन्सीची सुरुवात करुन अर्थव्यवस्थेला चालना देईल. डिजिटल चलन एका कुशल आणि स्वस्त चलन व्यवस्थापन प्रणालीलाही प्रोत्साहन देईल.