चेन्नई: भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आर्थिक स्थिरतेशी तडजोड न करता कोणत्याही वाढीला समर्थन न करता उपायांसाठी कटिबद्ध आहे. त्यामुळेच आताच्या परिस्थितीत धोरणांची मिमांसा केल्यावर हे लक्षात येते की, आरबीआयच्या धोरणांमुळेच कोरोना महामारीतील आर्थिक परिणाम कमी होण्यास मदत झाली, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले. व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित ३९व्या नानी पालखीवाला स्मृती व्याख्यानात ते बोलत होते.
गव्हर्नर दास म्हणाले, रिझर्व्ह बँक गरजेनुसार पुढील काळातही विविध उपाययोजनांसाठी तयार आहे. यासोबतच आम्ही वित्तीय स्थिरता कायम ठेवण्यासाठीही कटिबद्ध आहोत. ही स्थिरता कायम ठेवताना बँकांनी अडव्हान्समध्ये संसाधने जोडण्याची गरज आहे.
पुढील कालावधीत देशातील आर्थिक संस्थांना आर्थिक विकास वाढीसाठी अधिक कठीण स्थितीशी लढा द्यावा लागेल. यासोबतच दीर्घकालीन आर्थिक प्रणालीत स्थिरतेसाठीही प्रयत्नशील रहावे लागेल.