मीरगंज : ब्यौंधा येथील विवेक भदोरिया यांनी एमएससी केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने ऊसाची लागवड करून भरघोस उत्पादन मिळवले आहे. ऊस लागवडीसोबतच ते आंतरपिकेसुद्धा घेत आहेत. त्यांनी एक हेक्टरमध्ये १,८४९ क्विंटल ऊस उत्पादन घेतले आहे. शेतीसोबतच पशुपालन करून त्यांनी दीड वर्षात आठ लाखांची कमाई केली आहे. विक्रमी उत्पादनाबद्दल त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ब्यौंधा गावातील विवेक भदौरिया यांनी बीएस्सी (कृषी) केल्यानंतर काही काळ खासगी नोकरी केली. पुढे त्यांनी नोकरी सोडून कृषीशास्त्रात एमएस्सी केले. एमएस्सी केल्यानंतर त्यांनी १८ एकर जमिनीत उसाची लागवड सुरू केली. विवेक हे गेल्या काही वर्षांपासून करणपूर गावात राहणाऱ्या जबर पाल सिंग यांच्या संपर्कात आले. त्यांच्या सूचनेनुसार गेल्यावर्षी विवेक यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून उसाची लागवड केली. आधुनिक शेतीमुळे त्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली. आता ते दुसऱ्यांच्या जमिनी करारावर घेऊनसुद्धा ऊसाची लागवड करत आहेत. शेतीसोबतच ते पशुपालनही करतात.