लखनौ : उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी योगी आदित्यनाथ सरकारचे कौतुक करताना गेल्या पाच वर्षात राज्यात सुशासन युगाची सुरुवात झाल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या, ऊस शेतीचे लागवड क्षेत्र २०१६-१७ मध्ये २०.५ लाख हेक्टर होते. ते आता २०२१-२२ मध्ये वाढून २७.६ लाख हेक्टर झाले आहे. जवळपास ४५.४ लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०१७-१८ ते २०२१-२२ पर्यंत (१६ मे अखेर) उच्चांकी १,७२,७४५ कोटी रुपयांची ऊस बिले अदा करण्यात आली आहेत.
राज्यपाल पटेल म्हणाल्या की, २०१६-१७ मध्ये इथेनॉलचे उत्पादन ४३.२ कोटी लिटर होते, जे २०२०-२१ मध्ये वाढून जादा झाले आहे. यामध्ये उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठे इथेनॉल पुरवठादार राज्य म्हणून पुढे आले आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या उन्नत्तीसाठी हरेक प्रयत्न केले जात आहेत. खास करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार पहाडाप्रमाणे उभे राहिले आहे.
योगी सरकार २.० च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना राज्यपाल पटेल म्हणाल्या की, पुढील पाच वर्षामध्ये विकासाची एक नवी वाट खुली झालेली दिसून येईल. उत्तर प्रदेशला अनेक आघाड्यांवर अग्रेसर राज्य बनविण्यासाठी, गुंतवणुकीत वाढ, पायाभूत सुविधांमध्ये मजबुती आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या मुद्यांवर त्या म्हणाल्या, की पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत २.५५ कोटी शेतकऱ्यांना ४२,५६५ कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत. ८६ लाख शेतकऱ्यांचे ३६,००० कोटी रुपयांचे पिक कर्ज माफ करण्यात आले आहे.