नवी दिल्ली : महागाई होरपळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारने महागाईपासून दिलासा देताना खाद्यतेलाच्या आयातीवरील सीमाशुल्कात कपात जाहीर केली आहे. स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी खाद्यतेलाच्या आयातीवर लागू होणाऱ्या सीमाशुल्कातील कपातीची मुदत एक वर्षाने वाढवली आहे. त्यामुळे किमती आटोक्यात राहतील. केंद्र सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.
रिफाईंड सोयाबीन तेल आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क १७.५ टक्क्यांवरून १२.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. मार्च २०२५ पर्यंत हे दर कमी राहतील. केंद्र सरकारने जूनमध्ये क्रूड पाम तेल, कच्चे सूर्यफूल तेल आणि क्रूड सोयाबीन तेलावरील कस्टम ड्युटी ५ टक्क्यांनी कपात केली होती. खाद्यतेलावरील १५.५ टक्के कस्टम ड्युटी १२.५ टक्के कमी करण्यात आली आहे. मार्च २०२४ पर्यंत हा निर्णय लागू आहे. सरकारने ही सवलत एक वर्षाने वाढवली आहे. भारत इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून कच्चे पामतेल खरेदी करतो. अर्जेंटिना, ब्राझीलमधून सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची खरेदी केली जाते. कॅनडातून काही खाद्यतेलही आयात केले जाते.