पुणे : सद्यस्थितीत माळेगाव, छत्रपती आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हद्दीतही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. त्याचा परिणाम आडसाली व पूर्व हंगामी ऊस लागवडीवर यंदा होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. निरा खोऱ्यातील धरणांत अत्यल्प पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी धरण क्षेत्रावर अवलंबून असलेल्या पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यात अपेक्षित पाऊस झालाच नाही. आता या तिन्ही कारखान्यांनी नव्याने ऊस लागवडीचे धोरण जाहीर केले आहे. परंतु पावसाचा पत्ता नाही. बिकट परिस्थिती पाहून शेतकऱ्यांनी ऊस लागवडी टाळल्या असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यातही कमी- अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
सध्या बारामती तालुक्यात तापमान कमालीचे वाढलेले आहे. त्यात निरा डावा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने पाणी टंचाईचे सावट आता अधिक गडद होऊ लागले आहे. शेतकरी ठिबक सिंचनाकडे वळला आहे. ऊस लागण पद्धतीतही त्याने बदल स्वीकारले आहेत. परंतु तरीही उसासारख्या पिकाला पाण्याची अधिकची गरज असते. विहिरी, कुपनलिका यांचा पाणीसाठा वाढल्याशिवाय किंवा धरणात पाणीसाठा जमा होऊ लागल्याशिवाय ऊस लागवडीचे धाडस शेतकरी करणार नाहीत. ऊस लागवडीचा वाढता खर्चही शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे शेतकरी आधी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.