कोल्हापूर : मागील काही दिवसांपासून परिसरात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या उसाच्या फडाला आगी लागल्या आहेत. काही ठिकाणी संपूर्ण शिवार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या उसाचे तसेच शेतीतील विविध साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शेतीशी संबंधित नसलेल्यांकडून या आगीबद्दल शेतकऱ्यांची बदनामी केली जात आहे. कारखान्यांकडून जळीत कपातीमुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून जात आहे. साखर कारखान्यांनी जळीत उसातून होणारी कपात न करण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून केली जात आहे.
जळालेल्या उसाला गाळपासाठी प्राधान्यक्रम देऊन साखर कारखान्यांकडून तोड केली जाते. यंदा मजूर टंचाईमुळे ऊस उत्पादकांची पिळवणूक होत आहे. तोडणीसाठी एकरी सहा हजार रुपये खर्च आणि खुशाली द्यावी लागत आहे. यातच जळीत गाळपास उसातून दहा टक्के कपात साखर कारखाने करतात. त्यामुळे या उसाचा दर साधारण २८०० ते २९०० रुपये टनापर्यंत घटणार आहे. फड पेटल्यामुळे उसाच्या वजनात साधारण दहा टक्के घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी २० ते २५ हजार रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कपात कमीत कमी आकारावी, अशी मागणी आहे.