नवी दिल्ली : भारतातील 2023-24 चा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. कारण मोठ्या संख्येने साखर कारखाने बंद झाले आहेत. इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या 2023-24 साखर हंगामात, 31 मार्च 2024 पर्यंत साखरेचे उत्पादन 302.02 लाख टनांवर पोहोचले, जे मागील वर्षी याच तारखेला 300.77 लाख टन होते. मागीलवर्षी पेक्षा यंदा आतापर्यंत साखर उत्पादन जास्त झाले आहे.
मार्चअखेर देशभरात 322 साखर कारखान्यांनी गाळप बंद केले. गेल्या वर्षी याच वेळेपर्यंत 346 साखर कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले होते. म्हणजेच या वर्षी चालू असलेल्या साखर कारखान्यांची संख्या 210 पेक्षा जास्त आहे, तर गेल्या वर्षी याच तारखेला 187 साखर कारखाने सुरु होते. ISMA ने यापूर्वी मार्चमध्ये 2023-24 च्या हंगामातील निव्वळ साखर उत्पादन 320 लाख टन होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. साखरेचा देशांतर्गत वापर 285 लाख टन अपेक्षित आहे.
ISMA च्या मते, वरील उत्पादन आणि वापराच्या आकड्यांसह, हंगामाच्या अखेरीस 91 लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या विविध संस्थांनी 2024 मध्ये दमदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. परिणामी, 2024-25 मध्ये ऊस आणि साखरेचे उत्पादन आणखी सुधारण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ‘इस्मा’ने चालू हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्याची सरकारला विनंती केली आहे.