नांदेड : साखर कारखान्यांनी गाळप परवान्यांपूर्वी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाचे पैसे भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, अद्याप एकाही कारखान्याने हे पैसे भरलेले नाहीत. त्यामुळे नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडून अद्याप एकाही कारखान्याला गाळप परवाना देण्यात आलेला नाही. नांदेड विभागातील गाळप हंगामासाठी २९ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज सादर केले आहेत. यात २१ खासगी तर ८ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.
नांदेड विभागात मागीलवर्षी ३० साखर कारखाने सुरु झाले होते. यात १९ खासगी तर ११ सहकारी कारखान्यांचा समावेश होता. विभागात परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. यंदाचा हंगाम १ नोव्हेबरपासून सुरू झाला. यासाठी विभागातील साखर कारखान्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या मार्फत साखर आयुक्तांकडे गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. दरम्यान, शासनाने आदेश काढून कारखान्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाकडे मागील दोन वर्षाचे प्रती टन १७ रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम चार टप्यांत देण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, अद्याप ही प्रक्रिया झाली नसल्याने कारखान्यांचे गाळप परवाने रखडले आहेत.