कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी कारखान्याच्या कामकाजाबाबत आलेल्या तक्रारीवर चौकशीसाठी कागदपत्रांची उपलब्धता करून देण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाला दप्तर उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासकीय कार्यवाही करावी, असा अहवाल विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ (साखर) डी. बी. पाटील यांनी प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिला आहे.
कारभाराबाबत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी १९ एप्रिल व शिवाजी खोत यांनी २३ एप्रिलला साखर सहसंचालकांकडे तक्रार केली होती. यामध्ये प्रामुख्याने कारखाना व्यवस्थापनाबाबत तक्रारी आहेतच. त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कारखाना चालविण्यासाठी घेतलेल्या कोट्यवधी रुपये कर्जाचा विनियोग योग्य प्रकारे केला नसल्याचा आरोप केलेला आहे. त्यानुसार प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाल मावळे यांनी विशेष लेखापरीक्षक वर्ग- १ (साखर) डी. बी. पाटील यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
डी. बी. पाटील यांनी कारखाना व्यवस्थापनाकडे चौकशीसाठी दप्तर उपलब्ध करून देण्यास सांगितले. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कारखाना व्यवस्थापन चौकशीच्या अनुषंगिक दफ्तर उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे आपल्या स्तरावरून दफ्तर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही करावी, असा अहवाल सोमवारी डी. बी. पाटील यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मातले यांना पाठवला आहे.