मसूर : कोरोना वायरसच्या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक परिस्थितीतही सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने राज्यात सर्वात शेवटी कारखाना बंद करुन 100 टक्के गाळप पूर्ण करुन ऊस गाळपात अव्वल दर्जा मिळवला आहे. 152 दिवस गाळप हंगाम सुरु होता. या 2018-19 च्या हंगामात 11 लाख 94 हजार 692 मेट्रीक टनाचे गाळप व 14 लाख 83 हजार 600 क्विंटल साखरेचे उत्पादन करुन 2855 रुपये ऊसाचे बिल दिल्याचे सह्याद्री कारखान्याचे चेअरमन आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
गाळप हंगामाचा समारोप पूजा करुन करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सर्व वाहतुकदार, सुरक्षारक्षक आणि कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला.
सहकार मंत्री पाटील म्हणाले, कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउनचा शेतकर्यांवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे तब्बल 25 टक्के ऊस शेतात शिल्लक होता. पण कारखान्याने योग्य नियोजन करुन शिल्लक ऊसाचे गाळप केले. बाकी कारखाने मार्चमध्येच बंद झाले, पण सह्याद्री कारखान्याने 100 टक्के ऊस गाळप केला.
लॉकडाउनमुळे कारखान्यात अडकलेल्या मजुरांनी घरी सोडण्याची मागणी केली. पण कारखान्याने योग्य उपाययोजना राबवत सर्वांच्याच सहकार्याने हंगाम यशस्वी केला. दरम्यान सभासदांनाही लवकरच साखर दिली जाईल, अशी घोषणाही केली. याप्रसंगी कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, इरिगेशन विभाग संपर्कप्रमुख आर.जी. तांबे, मोहनराव पाटील, व्ही.बी. चव्हाण आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.