हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
बागपत (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
बागपत जिल्ह्यातील ३४ हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सगळे अडथळे दूर होऊन मलकपूर साखर कारखान्यात अडकलेले गेल्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले मिळण्याची चिन्हे आहेत. उत्तर प्रदेश राज्य सहकारी बँकेने मलकपूर साखर कारखान्याला २१० कोटी रुपयांचे अल्प मुदतीचे कर्ज मंजूर केले आहे. त्यामुळे आता कारखान्याला ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना बिलाची वाट पहावी लागणार नाही. पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये बिलाचे पैसे जमा होऊ लागणार आहेत.
उत्तर प्रदेश सरकार गेल्या काही दिवसांत ऊस उत्पादकांची बिले भागविण्याविषयी गंभीर होते. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कारखान्यांसाठी अल्प मुदतीचे कर्ज घेण्याची मुदत २२ फेब्रुवारीपर्यंत वाढवली. त्याचा फायदा घेत मलकपूर साखर कारखान्याने आवश्यक ती सर्व औपचारिक कागदपत्रे पूर्ण करून, घेतली. त्यामुळे राज्य सहकारी बँकेने २१० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील संपूर्ण ऊस दर खात्यावर जमा झालेला पहायला मिळणार आहे. तसेच यंदाच्या हंगामातील बिलासाठी पुढच्या वर्षीची वाट पहावी लगणार नाही.
गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, ऊस मंत्री सुरेश राणा यांची भेट घेऊन सातत्याने ऊस बिलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी दिली. मंत्री राणा यांच्या विशेष सहकार्याने कर्ज मंजूर झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थकीत बिले मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढच्या आठवड्यात त्यांच्या खात्यांवर गेल्या हंगामातील शिल्लक जमा होईल, असेही केंद्रीय राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी सांगितले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp