मुंबई : भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयातर्फे ३ जानेवारी रोजी लिलावासाठी गहू, तांदूळ उपलब्ध केला जाणार आहे. सुमारे १७,५०० मेट्रिक टन गहू आणि ५००० मेट्रिक टन कच्च्या तांदळाचा साठा विक्रीसाठी उपलब्ध होईल. घाऊक खरेदीदार, उत्पादक, खाद्यान्न प्रक्रिया उद्योजक, पीठ गिरण्या उद्योजक, गव्हापासून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांचे उद्योजक, व्यापारी लिलावात सहभागी होऊ शकतील. गोव्यासह महाराष्ट्र विभागांतर्गत एकूण २५ धान्यसाठा आगारांमधून गव्हाचा हा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
लिलावासाठी गव्हाच्या साठ्याची मर्याता ४००० मेट्रिक टनाने वाढवून १७५०० मेट्रिक टन केली आहे. नऊ आगारांतून ५,००० मेट्रिक टनाचा साठा उपलब्ध केला जाईल. खाद्यान्न प्रक्रिया उद्योजकांना एकाच ई-लिलावात प्रत्येकी किमान १० मेट्रिक टनासाठी बोली लावता येईल. तांदळासाठी प्रती निविदाकार बोलीची मर्यादा एक मेट्रिक टन ते २००० मेट्रिक टन असेल, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे. या निर्णयांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. भारतीय अन्न महामंडळ जून २०२३ पासून खुल्या बाजारातील विक्री योजनेअंतर्गत गहू आणि तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे.