नवी दिल्ली: दीर्घ काळापासून महागाईचा भार सोसत असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एक सप्टेंबरपासून पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात केली आहे. ही कपात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत करण्यात आली आहे. मात्र घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. १०० रुपयांच्या कपातीनंतर दिल्लीपासून देशभरात सिलिंडरचे नवे दर लागू झाले आहेत.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, देशाची राजधानी दिल्लीत आता कमर्शियल १९ किलोचा सिलिंडर ९१.५० रुपयांनी स्वस्त होवून १८४४ रुपयांना मिळत आहे. तर चेन्नईत या सिलिंडरच्या दरात ९६ रुपयांची घट होवून तो आताथ २०४५ रुपयांना मिळत आहे. हे दर गुरुवार, एक सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. जर १४.२ किलोचा घरगुती गॅस सिलिंडरचा दर पाहिला तर याच्या दरात ६ जुलैपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राजधानी दिल्लीत इंडेनच्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर १०५३ रुपये आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरचा दर १०५२ रुपये, कोलकातामध्ये १०७९ रुपये आणि चेन्नईत १०६८ रुपये दराने सिलिंडर मिळत आहे.