नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामानाशास्त्र विभागाने आगामी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि पुराच्या संकटाशी झुंज देत असलेल्या हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांना दिलासा मिळणार नाही असे स्पष्ट झाले आहे. दिल्लीला तूर्त दिलासा मिळाल्याचे दिसते.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे महाराष्ट्र आणि ओडिशाच्या डोंगराळ भागात पाणी साचण्याच्या घटना घडतील असा इशारा देण्यात आल्याचे एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. ओडिशामध्ये २४ जुलैपर्यंत जोरदार पाऊस कोसळू शकतो. बंगालच्या खाडीत कमी दबावाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाची शक्यता आहे. मलकानगिरी, कोरापुट, नबरंगपुर, कालाहांडी, कंधमाल, गंजम आणि गजपती या जिल्ह्यांतील संभाव्य भूस्खलनाचा धोका पाहता सुरक्षात्मक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
किनारपट्टीच्या राज्यांत येत्या पाच दिवसांत विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत शनिवारीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे मुसळधार ते अतिवृष्टी अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील पालघर आणि ठाण्यात शनिवारपर्यंत शाळा बंद राहतील. पुण्यातील शाळा बंद करण्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे.