नवी दिल्ली : इंधन कंपन्यांनी शनिवारसाठी पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आज, १६ एप्रिल रोजी इंधन दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज सलग दहाव्या दिवशी दर स्थिर आहेत. त्यामुळे आजचा दिवस लोकांना दिलासा देणारा ठरला आहे. यापूर्वी ६ एप्रिल रोजी इंधन दरात ८० पैसे प्रती लिटर वाढ करण्यात आली होती. आजही देशात जुन्या दरानेच विक्री सुरू आहेत. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर १०५.४१ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९६.६७ रुपये प्रती लिटर आहे.
लाइव्ह हिंदूस्थान डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, मुंबईत पेट्रोल १२०.५१ रुपये प्रती लिटर तर डिझेल १०४.७७ रुपये प्रती लिटर दराने विक्री केली जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ११५.१२ आणि ९९.८३ रुपये प्रती लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल ११०.८५ रुपये आणि डिझेल १००.९४ रुपये प्रती लिटर आहे. श्री गंगानगरमध्ये पेट्रोल १२२.९३ रुपये आणि डिझेल १०५.३४ रुपये प्रती लिटर आहे. भोपाळमध्ये पेट्रोल ११८.१४ रुपये आणि डिझेल १०१.१६ रुपये प्रती लिटर आहे. गेल्या १८ दिवसांत १० रुपयांनी इंधन दर वाढले आहेत. महाराष्ट्रातील परभणीत पेट्रोल १२३.४६ रुपये हे देशात सर्वात महाग दराने विक्री केले जात आहे. तर आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल १०७.६१ रुपये दराने मिळत आहे. तर सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये ९१.४५ रुपये आणि डिझेल ८५.८३ रुपये प्रती लिटर आहे.