कोल्हापूर :कोल्हापूर विभागातील बहुतांश साखर कारखान्यांनी ऊस बियाणे, रासायनिक खते, बिनव्याजी क्रेडिटवर दिल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी वर्गास मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना कारखान्यांकडून जिल्हा बँकेकडून विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून एकरी ४८ हजार रुपये पीककर्ज मिळते. मात्र या कर्जातून यांत्रिक मशागत, मजुरी, औषधे, रासायनिक खते, विद्युत बिल, पाणीपट्टीची कशीबशी तोंड मिळवणी होते.
वाढता खर्च विचारात घेता आता शेती व्यवसाय परवडेनासा झाला आहे.सध्या बहुतांश कारखान्यांनी उसासाठी रोप किंवा कांडी बियाणे तसेच लावण, भरणी व मान्सूनपूर्व या तिन्ही वेळेच्या रासायनिक खतांच्या मात्रासाठी एकरी १०:२६:२६ खताची तीन ते चार पोती व युरिया किंवा सल्फेटची दोन पोती पुरविली आहेत.या सर्वांची किंमत बिनव्याजी असून संबंधित शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या रकमेतून कपात होणार आहे.
दुसरीकडे कोल्हापूर विभागातील अनेक साखर कारखान्यांकडून गळीत हंगामातील उसाच्या एफआरपीची रक्कम एकरकमी देण्यात आलेली आहे.परंतु गत हंगामाच्या सुरुवातीस झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्य आंदोलनानंतरच्या संघटना व कारखानदारांतील समझोत्यानुसार गेल्या हंगामातील दुसरा प्रती टन ५० किंवा १०० रुपयांचा हप्ता अद्याप मिळालेला नाही.शेतकऱ्यांच्या नजर या थकीत ऊस बिलाकडे लागल्या आहेत. या थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघठनेतर्फे 26 जून रोजी कागल ते कोल्हापूर अशी कैफियत यात्रा काढण्यात येणार आहे.