कोल्हापूर, ता. 12 : यावर्षीच्या गळीत हंगामात उसाला एक रक्कमी एफआरपी मिळावी अशी मागणी केली जात असताना कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन 2300 रुपयांचा पहिला हप्ता ऊस उत्पादकांच्या नावावर जमा केला आहे. इतर कारखानेही याच फॉर्म्युल्यानूसार दर देण्यासाठी संपूर्ण याद्या तयार केल्या आहेत. कारखानदारांच्या आजच्या बैठक़ीत हाच निर्णय घेतला जाणार होता, मात्र ही बैठक रद्द झाली आहे. दरम्यान, कसबा बावडा येथील माजी आमदार महादेराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राजाराम कारखान्याने आजपासून हप्ता जमा करण्यास सुरूवात केली आहे. एक रक्कमी एफआरपी मिळावी यासाठी सुरू असलेल्या खटाटोपामध्ये अखेर एफआरपीचे तुकडे झाल्याने यावरून आंदोलन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकऱ्यांना एक रक्कमी आणि वेळेत एफआरपी मिळावी यासाठी शेतकरी कारखानदारांविरूध्द संताप व्यक्त करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, साखर कारखानदार एफआरपीची रक्कम दोन टप्प्यात देता यावी, यासाठी विविध बैठका घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दोन टप्प्यात एफआरपी देण्यास परवानगी किंवा एफआरपी देण्यासाठी 500 रुपयांचे अनुदान देण्याची मागणी केली होती. यावर आज कारखानदारांची बैठक होणार होती. त्यानंतर सर्वच कारखाने सोमवारपासून (ता. 14) प्रतिटन 2300 रुपयाप्रमाणे एफआरपीचा पहिला हप्ता दिला जाणार होता. पहिल्यांदा हा दर देणार कोण किंवा एकत्रित निर्णय घेवून एफआरपीचा पहिला हप्ता जमा केला जाणार होता. आज मात्र राजाराम कारखान्याने एफआरपीचा पहिला हप्ता जमा करण्याचे काम सुरू केले आहे. ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. त्या खातेदारांच्या मोबाईल पैसे जमा केलेला मोबाईल मॅसेज आल्यानंतर संबधीत शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. एक रक्कमी एफआरपी जमा होणार असताना किंवा तशी मागणी असताना एफआरपीचे तुकडे केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. राजाराम कारखान्याचे हे उदाहरण आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखाने हाच फॉर्म्युला वापरून तुकड्यानेच एफआरपी देणार असल्याचे चित्र आहे.
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp