सोलापूर : येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर ४३० कोटींच्या कर्जापोटी शिखर बँकेने केलेली जप्तीची कारवाई मागे घेतली आहे. या कर्ज वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने गोडावून सील करण्याची कारवाई केली होती. आता कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पाटील यांनी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मदत करण्याची विनंती केली होती. फडणवीस यांनी आम्ही सहकार्य करतो, तुम्ही लोकसभेला आम्हाला सहकार्य करा, अशी अट घातली. त्यामुळे पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
शुक्रवारी सकाळी कारखाना साखर गोडावूनला लावलेले सिल काढण्यात आले. कारवाई झाल्याने पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर पाटील यांनी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवारांना पाठिंबा देत फडणवीस यांना निमंत्रण दिले होते. पाच मे रोजी फडणवीस यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. याबाबत पाटील यांनी सांगितले की, जुन्या संचालक मंडळाने केलेले हे कर्ज आहे. २०२१ पासून बँकेची कारवाई सुरू आहे. माझ्यासाठी कारखाना चालणे महत्त्वाचे आहे. याकामी आम्ही राजकारण बाजूला सारून कारखान्याला महत्त्व दिले आहे.